भाजीपाला पिक सल्ला (krushik app)

भाजीपाला पिक सल्ला (krushik app)

भाजीपाला पिक सल्ला

कांदा : कांद्याची साठवणूक करताना साठवणगृहातील तापमान, आर्द्रता यांचा विचार गरजेचा आहे. साठवणगृहात अधिक आर्द्रता (७५-८० टक्के) असल्यास बुरशीचा प्रादुर्भाव होऊन कांदा सडतो. आर्द्रता एकदम कमी (६५ टक्क्यांपेक्षा कमी) झाल्यास कांद्याचे उत्सर्जन वाढून वजनात घट येते. साठवणगृहात ६५-७० टक्के आर्द्रता आणि २५-३० सेल्सिअस तापमान असल्यास फायदेशीर राहते. नैसर्गिक वायुविजनाचा वापर करून साठवणगृहाची रचना केल्यास तापमान व आर्द्रता काही अंशी मर्यादित ठेवून साठवणुकीतील नुकसान कमी करता येऊ शकते. नैसर्गिक वायुविजनावर आधारित चाळ ही एक पाखी आणि दोन पाखी या दोन प्रकारची असते. एक पाखी चाळीची उभारणी दक्षिण-उत्तर करावी. दोन पाखी चाळीची उभारणी पूर्व-पश्‍चिम करावी. चाळीची लांबी ५० फुटांपेक्षा जास्त असू नये. तळाशी हवा खेळती असावी, तसेच बाजूच्या भिंतीदेखील लाकडाच्या किंवा बांबूच्या असाव्यात. त्यास फटी असाव्यात. चाळीसाठी उंचावरची व पाणी न साठणारी जागा निवडावी. चाळीभोवतीची जागा स्वच्छ असावी. तळाशी मुरूम, वाळूचा थर द्यावा. त्यानंतर चाळीची उभारणी करावी. तळाशी १ फुटाची मोकळी जागा ठेवावी. चाळीचे छप्पर शक्‍यतो उसाच्या पाचटाने झाकावे. कौल महाग पडतात. चाळीचा खर्च वाढतो. सिमेंट किंवा पन्हाळी पत्र्यांनी चाळीत उष्णता वाढते. सिमेंट पत्रे व त्यावर उसाच्या पाचटाचे आच्छादन केले तर तापमान कमी राहण्यास मदत होते. चाळीचे छप्पर उतरते असावे. ते उभ्या भिंतीच्या ३ फूट पुढे असावे, त्यामुळे पावसाचे ओसाडे कांद्यापर्यंत पोचत नाहीत, कांदा खराब होणार नाही.

टोमॅटो : फळे पोखरणारी अळी अळी सुरवातीस पानांवर उपजीविका करते. त्यानंतर वाढणाऱ्या हिरव्या फळांवर आक्रमण करते. अळी टोमॅटोस छिद्र पाडून आतील भाग खाते. यामुळे फळांचा दर्जा खालावतो. एक अळी साधारणतः २ ते ८ फळांचे नुकसान करते. या किडीच्या व्यवस्थापनासाठी शेताच्या कडेने सापळा पीक म्हणून झेंडूची लागवड करावी. कमी क्षेत्र असल्यास मोठया आकाराच्या अळ्या आणि कीडग्रस्त फळे वेचून त्यांचा नाश करावा. एकरी १० कामगंध सापळे लावावेत. जैविक नियंत्रणासाठी एचएनपीव्ही (विषाणूजन्य कीटकनाशक) १ मिलि प्रतिलिटर पाण्यातून पुनर्लागवडीनंतर २८, ३५, ४२व्या दिवशी संध्याकाळच्या वेळी फवारणी करावी. आवश्यकतेनुसार अझाडिरॅक्टीन (१०,००० पीपीएम) २ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. फळे पोखरणाऱ्या अळीच्या रासायनिक नियंत्रणासाठी सायपरमेथ्रीन (१० ईसी) १ मिलि किंवा इमामेक्टीन बेन्झोएट (२५ डब्ल्यूडीजी) ०.४ ग्रॅम किंवा क्लोरॲन्ट्रानिलिप्रोल (१८.५ एससी) ०.३ मिलि किंवा फ्लूबेन्डामाईड (३९.३५ एससी) ०.३ मिलि प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
नागअळी - या अळ्या पानांच्या पापुद्र्यामध्ये शिरून हिरवा भाग खातात. परिणामी पानांच्या अन्न निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये बाधा येते. नागअळीच्या व्यवस्थापनासाठी पुनर्लागवडीपूर्वी कीडग्रस्त रोपांची पाने खुडून नष्ट करावीत. अंडी घालण्यास प्रतिबंध व्हावा, यासाठी पिकावर ५% निंबोळी अर्क किंवा अझाडिरॅक्टीन (१०,००० पीपीएम) २ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी अबामेक्‍टीन ०.४ मिलि किंवा सायॲन्ट्रानिलिप्रोल (१०.२६ ओडी) १.८ मिलि प्रतिलिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

वेलवर्गीय : फुलकिडे, मावा व पांढरी माशी या किडींची पिल्ले आणि प्रौढ पानांतील रस शोषून घेतात, त्यामुळे पाने वाकडी होतात. तसेच हे कीटक विषाणूजन्य रोगांचा प्रसार करतात. रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी व्हर्टीसिलीयम लीकॅनी ४ ग्रॅम किंवा थायमेथोक्‍झाम (२५ डब्ल्यूजी) ०.४ ग्रॅम किंवा कार्बोसल्फान १ मिलि प्रतिलिटर पाण्यात मिसळून नॅपसॅक पंपाच्या साह्याने फवारणी करावी. पिवळ्या व निळ्या रंगाचे चिकट सापळे प्रत्येकी १० प्रति एकरी या प्रमाणात पिकाच्या उंचीवर लावावेत.
नागअळी - अळी पानांच्या आत शिरून आतील हिरवा भाग खाते. त्यामुळे पानांवर पांढऱ्या नागमोडी रेषा दिसतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास पाने वाळून जातात. त्यामुळे फळांचे पोषण होत नाही. नागअळीच्या नियंत्रणासाठी अझाडिरॅक्टीन (१०,००० पीपीएम) २ मिलि किंवा डेल्टामेथ्रीन (१% ईसी) + ट्रायझोफॉस (३५% ईसी) (संयुक्त कीटकनाशक) २ मिलि किंवा सायॲन्ट्रानिलिप्रोल (१०.२६ ओडी) १.८ मिलि प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. फवारणी द्रावणामध्ये स्टीकरचा वापर करावा. कीडग्रस्त पिकाचे अवशेष जाळून नष्ट करावेत.

कोबीवर्गीय : कोबीवर्गीय भाजीपाला पिकांच्या पुनर्लागवडीनंतर गरजेनुसार एक किंवा दोन खुरपण्या करून माती भुसभुशीत आणि पीक तणविरहित ठेवावे. कोबीवर्गीय पिकांची मुळे उथळ असल्यामुळे खोलवर खुरपणी किंवा खांदणी करू नये. गड्डा धरू लागल्यानंतर रोपांना भर द्यावी. त्यामुळे गड्ड्याच्या ओझ्याने रोपे कोलमडणार नाहीत. ब्रोकोलीमध्ये खोडावर येणारी फूट अलगद काढावी, म्हणजे गड्डे चांगले मिळतात.

  
कृषक अँपलिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटन क्लिक करा
       

krushik app



Post a Comment (0)
Previous Post Next Post