बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राने पाच वर्षांपूर्वी आपले विषयतज्ज्ञ चीनला पाठवून तेथील शेतीची पद्धत
अभ्यासली आणि त्यातूनच मक्याच्या चायनीज तंत्राने संशोधकांनाही भुरळ घातली. कृषी विज्ञान केंद्रानेसुरवातीस चायनीज तंत्राने झिगझॅग पद्धतीने मक्याचे उत्पादन घेतले. त्यानुसार एका एकरात मक्याची
किमान ३५ हजार रोपे बसतात. योग्य वाण व मशागत केल्यास त्यातून ५० क्विंटलपेक्षा अधिक मका
उत्पादित होतो. केव्हीकेच्या प्रयोगापासून प्रेरणा घेत शेतकरीही चिनी; पद्धतीने मका लागवडीस प्राधान्य देऊ लागले आहेत.
सुरवड (ता. इंदापूर) गावचे रहिवासी महेशकुमार भाले यांनी चिनी पद्धतीचे हे तंत्र आत्मसात करून सलग
तीन वर्षे एकरी ५० ते ५२ क्विंटलपर्यंत मक्याचे उत्पादन घेण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. एवढेच नाही,
तर मूळतः संशोधक वृत्ती व अभ्यासाची सवय असलेल्या भाले यांनी केलेल्या प्रतिबंधात्मक उपायांमुळे
त्यांच्या पाच एकर मक्याला मागील वर्षी अमेरिकन लष्करी अळी शिवली नाही. मागील वर्षीही त्यांच्या पाच
एकर क्षेत्रात २५० क्विंटल मका पोती त्यांनी उत्पादित केली.
🌽🌽 अधिक उत्पादनाचे चायनीज तंत्र
महाराष्ट्रात पारंपरिक मका लागवडीच्या पद्धतीत ती ढाबा पद्धतीने किंवा सरी पद्धतोने केली तरी
जास्तीत जास्त २६ ते ३० हजार रोपे एकरी टिकतात. आपल्याकडील शिफारशीत पारंपरिक लागवडीत
ओळीतील अंतर २ ते २.५ फूट, रोपांमधील अंतर आठ ते नऊ इंच असते. तुलनेने ओळी व रोपांची दाटी
अधिक झाल्याने सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळत नाही. मात्र चीनमध्ये मक्याची लागवड करताना मध्यभागी
दीड फुटाचे अंतर ठेवून मक्याच्या दोन ओळी झिगझॅग पद्धतीने लावल्या जातात. दोन मका रोपांतील
अंतर दीड फूट, परंतु एका जागी पाच सेंटिमीटर अंतर ठेवून केले जाते. दीड फूट अंतर असले तरी अडीच
फुटांचा पट्टा राहत असल्याने मोकळी हवा व सूर्यप्रकाश जास्त मिळतो.
लागवडीसाठी अत्याधुनिक अवजारे
वडापुरी (ता. इंदापूर) येथे महेश भाले गेली चार वर्षे हेच तंत्र वापरत आहेत. ते दरवर्षी पाच एकर क्षेत्रात
मका करतात. पारंपरिक पद्धतीत २५ ते ३० क्विंटलपर्यंतच त्यांना उत्पादन व्हायचे. आता मागील चार
वर्षांपासून चिनी पद्धतीने ते उत्पादन घेत आहेत. त्यातून ५० क्विंटलच्या पुढेच उत्पादन मिळते असा
त्यांचा दावा आहे.दरवर्षी १ ते १५ जूनदरम्यान ते मक्याची लागवड करतात. त्यासाठी उन्हाळ्यात नांगरून शेती तापवलीकी, शेणखत अथवा हिरवळीचे खत विस्कटून फणपाळी केली जाते. एकरी आठ किलो मक्याचे बियाणे
वापरले जाते. एका ठिकाणी दोन बियाणे शेतीत रुजण्यासाठी बीबीएफच्या अवजारामध्ये त्यांनी बदल केले
आहेत. चकत्यांना आणखी खाचा पाडून दोन दोन बियाणे पडतील, अशी रचना करून मजुराचाही खर्च कमी
केला आहे. मक्यासाठी भाले हे डी.ए.पी., निंबोळी खत देतात. पेरणीपूर्वी बुरशीनाशक व कीडनाशकाची
बीजजप्रक्रिया करतात. वाफा पद्धतीत बियाणे पेरल्यानंतर ठिबकच्या नळ्या अंथरल्या जातात. मक्याचे
बियाणे भलेही चाळीस हजारांपर्यंत एकरी रुजले तरी पाखरे बियाणे फस्त करतात. यावर उपाय म्हणून
त्यांनी बांबूच्या काठ्या उभ्या केल्या. या काठीला दारूसाठी वापरल्या जाणाऱ्या काचेच्या बाटल्या, त्याला प्लॅस्टिकची पट्टी व वायसर लावला जातो. वाऱ्यामुळे वायसर बाटलीला आदळून सतत आवाज होतो. हा
आवाज ऐकून पाखरे तिकडे फिरकत नाहीत, असा त्यांचा अनुभव आहे. मागील चार वर्षांत पाखरांना त्रास न
दिल्याने मक्याची रोपे मोठ्या संख्येने जिवंत राहिली.
अमेरिकन अळीचा प्रतिबंध
गेली दोन वर्षे अमेरिकन अळीने राज्यातच नव्हे; तर देशभरात थैमान घातले आहे. भाले हे तर पाच एकरांवर
पीक घेतात. त्यांनी हे पीक सुरक्षित राहण्यासाठी फेरोमोनचे कामगंध सापळे लावण्याचा प्रयोग केला. मका
उगवून थोडी वाढताच लावलेल्या या सापळ्यांनी एका-एका सापळ्यात २५० ते ३०० अळीचे मादी पतंग
सापडले, क्षेत्रात सात ते आठ सापळे लावले. त्यामुळे लष्करी अळीचा बंदोबस्त करता आला. या मक्याच्या
उत्पादनात त्यांना एकरी ५२ किंवंटल उत्पादन मिळाले. चार वर्षांपासून हे सरासरी उत्पादन मिळत असल्याचे
त्यांचे म्हणणे आहे. तत्पूर्वी पारंपरिक पद्धतीने एकरी २५ ते ३० क्विंटल एवढे उत्पादन मिळत असे.
🌽🌽 कमीत कमी क्षेत्र, खर्चात अधिकाधिक उत्पादनवाढीचे प्रयोग शेतकऱ्यांनी केले पाहिजेत. भाले यांच्यासारखे
शेकडो नव्हे, हजारो शेतकरी झाले पाहिजेत. अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने नेहमीच पुढील दहा-वीस
वर्षांचा विचार करीत नव्या तंत्राचा स्वीकार केला. हे तंत्र वेगाने शेतकऱ्यांपर्यंत पोचले आणि त्याचे यशस्वी
प्रयोग नव्या शेतकऱ्यांपर्यंत वेगाने पोचले, तर त्याचा फायदा होईल. - राजेंद्र पवार, प्रमुख, अँग्रिकल्चरल
डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती
🌽🌽 मक्याच्या लागवडीची चिनी तंत्राची पद्धत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. ‘केव्होके’मध्ये प्रयोग होऊन
त्याची सत्यता पटल्यानंतर अनेक शेतकरी अशा पद्धतीने मका उत्पादनाकडे वळले आहेत. -
संतोष करंजे,(विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बारामती)
➖➖➖

