कापूस
पूर्वहंगामी कापसाची लागवड टाळा साधारणपणे
८०-१०० मि.मी. पाऊस पडल्यानंतर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कपाशीच्या लागवडीची शिफारस आहे. मात्र, ओलीताखालील कापूस क्षेत्रात अनेक शेतकरी एप्रिलचा शेवटचा आठवडा ते मे महिन्याचा पहिला पंधरवडा कपाशीची पूर्वहंगामी लागवड करतात. आधीच मागील पिकाचा मार्चपर्यंत लांबवलेला हंगाम आणि एक, दीड महिन्याच्या अंतराने केलेली पुढच्या हंगामातील कपाशी लागवड यामुळे किडीसाठी वर्षभर खाद्यपुरवठा होत राहतो. त्यांचे जीवनचक्र खंडित होण्यास फारच कमी कालावधी राहतो. गुलाबी बोंडअळीचे पतंग कोवळ्या पात्या, कळ्या, व बोंडावर अंडी घालण्यास अधिक पसंती देतात. पूर्वहंगामी लागवडीच्या कपाशीला पात्या लागण्याची अवस्था जुलै महिन्याच्या दरम्यान येते. मागील हंगामातील सुप्तावस्थेत असणाऱ्या गुलाबी बोंडअळ्यांपासून निघणारे पतंगही याच कालावधीत बाहेर पडतात. अशाप्रकारे गुलाबी बोंडअळीची नवीन हंगामातील पहिली पिढी ही पूर्वहंगामी पिकावरच तयार होते. पुढे हाच प्रादुर्भाव नंतर जून-जुलैमध्ये लावलेल्या हंगामी कपाशी पिकावर प्रसारित होतो. याउलट, पूर्वहंगामी कपाशीची लागवड करणे टाळल्यास जून-जुलैदरम्यान सुप्तावस्थेतून निघालेल्या पतंगांना अंडी घालण्यास योग्य जागा मिळत नाही. तसेच त्यांनी घातलेल्या अंड्यांतून बाहेर पडलेल्या अळ्यांना उपजीविकेसाठी पात्या, फुले व कोवळी बोंडे उपलब्ध नसल्याने त्या मरून जातात.
----------------------------------------------------------------------------------------------------------------