वेल वर्गीय पिके
खरबूज लागवड जानेवारी-मार्च महिन्यात केली जाते. या पिकाला उष्ण, कोरडे हवामान व भरपूर सूर्यप्रकाश मानवतो. वेलीच्या चांगल्या वाढीसाठी २४ ते २६ अंश सेल्सिअस तापमान योग्य आहे. रेताड, मध्यम काळी व उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७ असावा. क्षारयुक्त, पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत हे पीक घेऊ नये. भारी जमिनीत पिकास नियमित पाणी न मिळाल्यास फळे तडकतात. लागवडीसाठी अर्का राजहंस, अर्का जीत, पुसा शरबती, हरा मधू या सुधारित जातींचा वापर केला जातो. तसेच खासगी कंपनीच्या कुंदन, बॉबी, लायलपूर-२५७, मधू-१४९ इ. जाती प्रचलित आहेत. पूर्वी खरबूज लागवड थेट बी टोकून करत. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाप्रमाणे प्लास्टिक ट्रेमध्ये रोपे तयार करून पुनर्लागवड केल्यास वेलीचे योग्य पोषण, मजूर, पाणी, इतर निविष्ठांवर होणारा खर्च आणि वेळ वाचण्यास मदत होते. यासाठी ९८ कप्पे असलेला प्रो-ट्रे वापरावा. एक ट्रे भरण्यासाठी किमान १.२५ किलो कोकोपीट लागते. एकरी २००-२५० ग्रॅम बियाणे आवश्यक आहे. पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. कोकोपीटने भरलेल्या ट्रेमध्ये बोटांच्या सहाय्याने छोटा खड्डा घेऊन एका कप्प्यात एक बी पेरून कोकोपीटने झाकावे व पाणी द्यावे. सुमारे ८ ते १० ट्रे एकावर एक ठेऊन काळ्या पॉलीथीन पेपरने झाकून घ्यावेत. रोपे उगवून आल्यानंतर ३ ते ४ दिवसांत पेपर काढावा, ट्रे खाली उतरून ठेवावेत. १४ ते १६ दिवसांत (पहिल्या फुटवा फुटल्यानंतर) रोपांची पुनर्लागवड करावी.