पशु संवर्धन :-
🐮आहार व्यवस्थापन जनावरांना गोठ्यातच कोरडा चारा उपलब्ध करून द्यावा. जनावरांना शरीरस्वास्थ्य व उत्पादनासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. जर शरीरजावारांचेस्वास्थ्यासाठी लागणारी ऊर्जा कमी पडली, तर उत्पादनासाठीची ऊर्जा वापरली जाते. त्यामुळे दूध उत्पादन किंवा फॅट व एस.एन.एफ.मध्ये घट दिसून येते. थंड वातावरणात जनावरांना शरीराचे तापमान योग्य राखण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. ऊर्जेच्या कमतरतेमुळे जनावरांचे शरीर थंडीने थरथरताना दिसते. अशावेळी जर शरीरावरील केस ओले असतील, तर ऊर्जेची गरज अजून वाढते. कमी होत जाणाऱ्या तापमानानुसार खाद्यात ऊर्जेचा स्त्रोत वाढविला, तरच दुभत्या गाई-म्हशींना थंडीपासून संरक्षण मिळू शकते. अशा वातावरणात जनावरांचे चारा खाण्याचे प्रमाण १०-२० टक्क्यांपर्यंत वाढते. हे वाढलेले प्रमाण जनावरे शरीरस्वास्थासाठी लागणारी अतिरिक्त ऊर्जा मिळविण्यासाठी वापरतात. कोठीपोट पूर्ण भरलेली जनावरे जास्त ऊर्जा उत्पन्न करून थंडीपासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतात. थंड वातावरणात असणारी ऊर्जेची कमतरता लगेच भरून येत नाही, त्यामुळे खाद्यातील कुठलेही बदल हळूवार करावेत. ऊर्जायुक्त खाद्यघटक जनावरांना दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी द्यावे, जेणेकरून पचनातून निर्माण होणारी ऊर्जा रात्रीच्या वेळेस कामी येऊ शकेल. त्यामुळे तापमान कमी होण्याआधी आंबवण किंवा पशुखाद्याव्यतिरिक्त ऊर्जायुक्त घटक जसे मका १ किलो, बायपास फॅट १०० ग्रॅम इत्यादी पशुखाद्यासोबत द्यावे. जनावरांना ताजे व स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे. पाणी जास्त थंड असल्यासही गाई-म्हशी पाणी कमी पितात, पोटातील आम्लता वाढते. त्यामुळे उत्पादन व शरीरस्वास्थ्य इत्यादीवर विपरीत परिणाम होतो. शक्य झाल्यास गाई-म्हशींना कोमट पाणी पिण्यास द्यावे.