गहू पिक
बागायती गव्हासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, भारी व खोल जमिनीची निवड करावी. मध्यम जमिनीत माती परीक्षणानुसार भरखते आणि रासायनिक खतांचा वापर केल्यास उत्पादन चांगले मिळते. हलक्या जमिनीत गहू लागवड टाळावी. गव्हाच्या मुळ्या जमिनीत ६०-७५ सें.मी. खोलवर जातात. म्हणून भुसभुशीत जमिनीची निवड करावी. जमिनीची चांगली मशागत करावी. शेवटच्या कुळवणीअगोदर एकरी ४ ते ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावे. पूर्वीच्या पिकांची धसकटे, इतर काडीकचरा वेचून शेत स्वच्छ करावे. बागायती पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. या कालावधीत पेरणी केल्यास फुटव्यांची संख्या, ओंबीची लांबी, ओंबीतील दाण्यांची संख्या, दाण्याचा आकार आणि वजन वाढून उपेक्षित उत्पादन मिळते. बागायती गव्हाची पेरणी १५ नोव्हेंबरनंतर केल्यास प्रत्येक पंधरवड्यास एकरी एक क्विंटलने उत्पादन कमी येते. वेळेवर पेरणीसाठी एकरी ४०-५० किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी ३ ग्रॅम थायरम प्रतिकिलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर ॲझोटोबॅक्टर आणि पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास प्रक्रिया करावी. पेरणीवेळी जमिनीत पुरेशी ओल असावी. योग्य ओल नसल्यास प्रथम जमीन ओलवावी. वाफसा आल्यावर जमीन कुळवावी. पेरणी दोन ओळींत २० सें.मी. अंतर ठेऊन करावी. पेरणी उथळ (५-६ सें.मी. खोल) करावी. पेरणी उभी-आडवी अशा दोन्हीबाजूने न करता एकेरी करावी. बियाणे झाकण्यासाठी कुळव उलटा करून चालवावा. पाण्याचा प्रवाह, जमिनीचा उतार व प्रकार लक्षात घेऊन २.५-४ मीटर रुंद आणि ७-२५ मीटर लांब सारे पाडावेत.