पशु संवर्धन :-
पैदाशीसाठी वळूची निवड
🐂 सर्वोत्तम वळू तयार करणे हे अवघड, खर्चिक व खूप वेळ लागणारे काम आहे. त्यामुळे हा उपक्रम शासकीय, निमशासकीय संस्था व खासगी कंपन्या करू शकतात. परंतु त्यांच्याकडे असलेल्या कोणत्या वळूची निवड आपण करायची?, हे पशुपालकांनी गोपैदासीच्या धोरणानुसार ठरवावे.
🐂 आपल्या गोठ्यावरील आहे त्याच गाई पुढील पिढी तयार करण्यासाठी वापराव्या लागतात. त्यामुळे प्रत्येक गाईला कोणता वळू वापरून कृत्रिम रेतन करायचे हे आपण ठरवले पाहिजे.
🐂वळूची निवड करताना गाय ज्या जातीची आहे, त्याच जातीच्या वळूची निवड करावी. वळूच्या दुग्धोत्पादन क्षमतेबद्दलचे पैदास गुणांकन हे गाईपेक्षा अधिक आहे हे निश्चित करावे.
🐂वळूतील दुग्धोत्पादन वाढवणारे जे गुण आहेत ते पुढील पिढीत पाठवण्याचे प्रमाण किती आहे? याचा अभ्यास झालेला असला पाहिजे, यासाठी जनुकीय चाचणी केलेला किंवा सिद्ध वळूचा वापर करावा.
🐂वळू वापरताना वळूमातेचे, त्याच्यापासून जन्मलेल्या कालवडीचे दूध उत्पादन, शारीरिक ठेवण, कासेची ठेवण, कासदाहाचे प्रमाण इत्यादी बाबींची माहिती करून घ्यावी. सर्वोत्तम वळू आपल्या गोठ्यावर वापरावा.
🐂वळू निवडताना फक्त दूध उत्पादनच बघू नये, त्याचे इतर आनुवंशिक गुणसुद्धा लक्षात घेतले पाहिजे.
योग्य वळूची निवड केल्यास गाईमधील नको असलेले गुणधर्म कमी होऊन चांगले गुण कालवडीमध्ये आपोआप येतील. फायदेशीर दुग्धव्यवसायासाठी आवश्यक कालवडी गोठ्यात जन्माला येतील.