आंबा बागेमध्ये मोहोर संरंक्षण

आंबा

मोहोर फुटलेल्या आंबा बागेमध्ये मोहोरावर तुडतुडे, मिजमाशी इत्यादी किडींचा तसेच भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो. यासाठी मोहोर फुलण्यापूर्वी तुडतुडे आणि मिजमाशीच्या नियंत्रणासाठी, मोहोर संरक्षण वेळापत्रकानुसार तिसरी फवारणी, इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.३ मि.लि. अधिक भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी, हेक्झाकोनॅझोल (५ ईसी) ०.५ मि.लि. किंवा विद्राव्य गंधक (८० डब्ल्यूडीजी) २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. 

मोहोरावर आणि फळांवर फुलकिडींचा (थ्रीप्स) प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो. फुलकिडींच्या प्रादुर्भावामुळे कोवळ्या सालीचा भाग खरवडल्यामुळे तो भाग काळा पडतो, पाने वेडीवाकडी होतात व नंतर गळून पडतात. मोहोराचे दांडे खरवडल्यासारखे दिसतात. मोहोर काळा पडून गळून जातो. प्रादुर्भाव दिसून येत असल्यास, नियंत्रणासाठी स्पीनोसॅड (४५ एससी) ०.२५ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे संपूर्ण झाडावर फवारावे. 

मोहोर नुकताच फुलत असताना ते फळधारणा होईपर्यंत कीटकनाशकाची फवारणी टाळावी. फवारणी करणे गरजेचीच असल्यास बागेतील परागीकरण करणाऱ्या कीटकांवर होणारा परिणाम टाळण्यासाठी परागीकरणाचा कालावधी वगळून सकाळी ९-१२ किंवा सायंकाळी ३ वाजल्यानंतर फवारणी करावी. 

फळधारणा होऊन वाटाणा आकाराच्या अवस्थेत असताना फळांवर तुडतुड्याचा आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. मोहोर संरक्षण वेळापत्रकानुसार चौथी फवारणी (तिसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांच्या अंतराने) थायमेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) ०.१ ग्रॅम अधिक भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झाकोनॅझोल (५ ईसी) ०.५ मि.लि. किंवा विद्राव्य गंधक (८० डब्ल्यूडीजी) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. 

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post