गहू
कीड नियंत्रण
⭕️ खोडमाशी
उशिरा पेरणी झालेल्या गव्हामध्ये किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळतो. ढगाळ हवामान किडीस पोषक असते. किडीची अळी दवबिंदूतील ओलाव्याच्या मदतीने पोंग्यात शिरून गाभा खाते. त्यामुळे रोपमर, तसेच फुटवे मर दिसून येते. पूर्ण वाढ झालेली अळी ८ ते १० मि.मी. लांब असून पिवळसर रंगाची असते. मृत पोंगा ओढल्यास तळाशी खोडमाशीची अळी दिसून येते.
👉नियंत्रण
पोंगेमर किंवा फुटवे मर १० टक्के दिसून आल्यास, ५ टक्के निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस (२५ ईसी) १.५ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून १ ते २ फवारण्या कराव्यात.
⭕️ मावा
पिले व प्रौढ पानांच्या पाठीमागच्या बाजूस, कोवळे शेंडे तसेच खोडावर समूहाने एकवटलेले दिसून येतात व त्यातील पेशीरस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळसर रोगट होतात. मधाप्रमाणे चिकट द्रव विष्ठेवाटे पांनांवर, खोडावर व गव्हाच्या कोवळ्या शेंड्यांवर टाकते, त्यावर काळी बुरशी वाढुन पानाची प्रकाश संश्लेषण क्रिया बंद होते, परिणामी रोपे मरतात आणि पीक उत्पादनात मोठी घट येते.
👉 नियंत्रण
शेतामध्ये पिवळ्या चिकट कार्डचा वापर एकरी १० ते १२ या प्रमाणात (सर्वेक्षण व नियंत्रणासाठी) करावा. जैविक उपायांमध्ये लेकॅनिसिलीयम लेकॅनी किंवा मेटाऱ्हायझियम ॲनिसोप्ली ४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून १० ते १५ दिवसांच्या अंतराने दोनवेळा फवारावे. जैविक उपाययोजना करूनही कीड नियंत्रित होत नसल्यास, थायमिथोक्झाम ०.१ ग्रॅम किंवा ॲसिटामिप्रीड ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून १० ते १५ दिवसांच्या अंतराने दोनवेळा फवारावे.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.