रब्बी ज्वारी
किमान तापमान १४ अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास, मावा किडीचे प्रमाण वाढते. माव्याचे प्रौढ व पिले पानाच्या खालच्या बाजूस राहून रस शोषतात, त्यामुळे पाने आकसून मागील बाजूस वळतात. किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यास पाने तांबडी पडून वाळून जातात. पर्यायाने झाडाची वाढ खुंटते. पिकाच्या पोटरी अवस्थेत माव्याचा प्रादुर्भाव आढळल्यास कणसे बाहेर पडत नाहीत किंवा अर्धवट बाहेर पडतात. अशा कणसात दाणे भरण्याचे प्रमाण अत्यल्प असते. मावा किडीने केलेल्या जखमेमुळे पानातील साखरयुक्त द्रव बाहेर येतो. तसेच किडीच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या साखरयुक्त चिकट द्रवामुळे पाने चिकट होतात. यालाच ‘चिकटा’ असे म्हटले जाते. या चिकट द्रवावर काळी बुरशी वाढते. त्याचा प्रकाश संश्लेषण क्रियेवर विपरीत परिणाम होऊन धान्य आणि कडब्याचे उत्पादन व प्रत घटते.
थंडीचे प्रमाण वाढू लागताच पिकाची वेळोवेळी पाहणी करावी. जेणेकरून माव्याचा प्रादुर्भाव आढळून येताच योग्य त्या उपाययोजना करता येतील. माव्यावर उपजीविका करणार्या मित्र किडी; जसे की लेडीबर्ड बीटल, क्रायसोपा, सिरफिड माशी यांच्या अळ्या ३-४ प्रतिपान आढळल्यास कीटकनाशकाची फवारणी करण्याची आवश्यकता नाही. माव्याचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात असल्यास ५% निबोंळी अर्काची फवारणी करावी. त्यानंतर पंधरा दिवसांनी व्हर्टिसिलीयम या जैविक कीटकनाशकाची ४ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. या उपायांनी कीड नियंत्रणात न आल्यास, डायमिथोएट (३० ईसी) १.५ मि.लि. किंवा थायमेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) ०.३ ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.३ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.