हळद पिकातील काढणीपूर्व नियोजन.

 हळद


सर्वसाधारणपणे जातीपरत्वे हळद काढण्यास ७ ते ९ महिने लागतात. यामध्ये प्रामुख्याने हळव्या जातींना (उदा. आंबे हळद) तयार होण्यास लागवडीपासून ६ ते ७ महिने लागतात. नीम गरव्या जाती (उदा. फुले स्वरूपा) ७ ते ८ महिन्यांत काढणीस येतात. गरव्या जाती (उदा. सेलम, कृष्णा) ८ ते ९ महिन्यांमध्ये काढणीस तयार होतात. त्यामुळे जातीपरत्वे कालावधी पूर्ण झाल्याशिवाय पाला कापू नये. जमिनीच्या पोताप्रमाणे माळरानाच्या हलक्या जमिनीमध्ये ८० ते ९० टक्के पाने पिकाचा कालावधी पूर्ण होतेवेळी वाळलेली असतात. मध्यम व भारी जमिनीमध्ये ६० ते ७० टक्के पाने वाळलेली असतात. हे हळद पीक काढण्यापूर्वीचे मुख्य लक्षण आहे. काढणी अगोदर १५ ते ३० दिवस पाणी देणे बंद करावे. पाणी बंद करताना प्रथम पाणी थोडे थोडे कमी करून नंतर पूर्णपणे बंद करावे. त्यामुळे पानातील अन्नरस कंदामध्ये लवकर उतरण्यास मदत होते. त्यामुळे हळकुंडाला वजन, गोलाई आणि चकाकी येते. जर पाणी शेवटपर्यंत चालू ठेवले, तर हळकुंडाला नवीन फुटवे फुटू लागतात. त्यामुळे उत्पादनात घट होते. पाला वाळल्यानंतर एक इंच जमिनीच्या वर खोड ठेवून धारदार विळ्याने हळदीचा पाला कापावा. पाला बांधावर गोळा करावा. शेत चार ते पाच दिवस चांगले तापू द्यावे, त्यामुळे हळदीच्या कंदामध्ये असलेल्या पाण्याच्या अंशामुळे जमीन साधारणपणे भेगाळली जाते. हळदीची काढणी करणे सुलभ होते.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post