पशु संवर्धन :-
दुधाळ जनावरांच्या आहारात दाणा मिश्रण व सुक्या चाऱ्याचा समावेश करावा. आहारात हरभरा, ज्वारी किंवा गहू कुटाराचे प्रमाण वाढवावे. जनावरांना पुरवलेला आहार पचायला वेळ लागतो. म्हणजेच जनावराने एकदा जो आहार ग्रहण केला, की चयापचय प्रक्रिया चालू होऊन त्यापासून जनावराला ऊर्जा कमीत कमी सहा ते दहा तासांनी उपलब्ध होते आणि या उर्जेचा उपयोग करून जनावरे त्यांच्या शरीरातील तापमान नियंत्रित करून थंडीच्या ताणापासून स्वतःचे रक्षण करतात. म्हणून दुधाळ जनावरांना संध्याकाळी पुरवला जाणारा आहार हा सहा ते सात वाजता पुरवावा. जेणेकरून ही ऊर्जा त्यांना जवळपास रात्री दोन ते सकाळी सहा वाजायच्या दरम्यान वापरता येईल. खास करून महाराष्ट्रात याच काळात, म्हणजे पहाटेच्या वेळेस जनावरांवर थंडीचा ताण जास्त प्रमाणात पाहायला मिळतो.