पूर्वहंगामी ऊस खत व्यवस्थापन,आडसाली ऊस पाणी नियोजन,खोडवा ऊस पूर्वनियोजन.

 पूर्वहंगामी ऊस


पूर्वहंगामी ऊस पिकास एकरी १३६ किलो नत्र, ६८ किलो स्फुरद व ६८ किलो पालाश खतमात्रा शिफारशीत आहे. मात्र, ही खतमात्रा माती परीक्षणानुसार द्यावी. माती परिक्षमामुळे जमिनीचा सामू, सेंद्रीय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश बरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्यांची स्थिती कळते. को ८६०३२ या मध्यम उशिरा पक्व होणाऱ्या ऊस जातीस अन्नद्रव्यांची गरज जास्त असल्याने या जातीस नत्र, स्फुरद आणि पालाशयुक्त खतांची मात्रा २५ टक्के जास्त द्यावी. ऊस पिकाच्या उगवण, फुटवे, कांडी सुटणे आणि जोमदार वाढ ह्या प्रमुख वाढीच्या अवस्था आहेत. नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांची वाढीच्या अवस्थेनुसार गरज लक्षात घेता, उसासाठी चारवेळा खते विभागून देणे आवश्‍यक आहे. उगवण ते फुटवे येईपर्यंत उसास नत्राची गरज फार कमी असते. १० टक्के नत्र लागवडीपूर्वी उगवणीसाठी आणि मुळांच्या व अंकुरांच्या जोमदार वाढीसाठी स्फुरद व पालाश प्रत्येकी ५० टक्के द्यावे. फुटवे फुटताना आणि त्यांच्या वाढीसाठी नत्राची गरज असते, म्हणून लागणीनंतर ६ ते ८ आठवड्यांनी नत्राचा ४० टक्के दुसरा हप्ता आणि १२ ते १४ आठवड्यांनी ऊस कांड्यांवर आल्यानंतर नत्राचा १० टक्के तिसरा हप्ता जमिनीत पेरून द्यावा. उसाच्या जोमदार वाढीच्या वेळी सर्व अन्नघटक जास्त प्रमाणात शोषले जातात, म्हणून मोठ्या बांधणीच्या वेळेस नत्राचा शेवटचा ४० टक्के हप्ता, स्फुरद व पालाशचा प्रत्येकी ५० टक्के दुसरा हप्ता देणे आवश्‍यक आहे. लागणीनंतर ४ ते ५ महिन्यांपर्यंत रासायनिक खतांचे सर्व हप्ते पूर्ण करावेत.


आडसाली ऊस खत व्यवस्थापन आणि सुरु ऊस पाणी नियोजन.


आडसाली ऊस
पिकाची पाण्याची गरज ही वाढीची अवस्था, जमिनीचा प्रकार, हंगाम यावर अवलंबून असते. जास्त पाणी दिल्यास जमीन क्षारपड होण्याची शक्यता असते. वाढीच्या सुरवातीच्या काळात पाण्याची गरज कमी असते. मात्र बांधणीनंतर जास्त पाण्याची गरज असते. सर्वसाधारणपणे वाढीच्या अवस्थेत पावसाळ्यात (जुलै-ऑक्टोबर) १५ ते २० दिवसांनी, हिवाळ्यात (नोव्हेंबर-फेब्रुवारी) १८ ते २० दिवसांनी, तर उन्हाळ्यात (मार्च-जून) ८ ते १० दिवसांनी पाणी द्यावे. आडसाली उसास साधारणपणे ३८-४० पाळ्या द्याव्या लागतात. उगवण व फुटवा फुटण्याच्या काळात साधारणपणे ८ ते १० सें.मी. (वरंब्यांच्या अर्ध्या उंचीपर्यंत) पाणी द्यावे. बांधणीनंतर जोमदार वाढीच्या काळात १० ते १२ सें.मी. (वरंब्याच्या २/३ उंचीपर्यंत) व पक्वता कालावधीमध्ये ७ ते ८ सें.मी. पाणी एका पाळीस द्यावे.


  • खोडवा ऊस
  • खोडवा पीक घेताना विचारात घ्यावयाच्या बाबी 
  • सर्वसाधारणपणे १५ फेब्रुवारीपर्यंत तुटलेल्या ऊसाचाच खोडवा ठेवावा. त्यानंतर घेतलेल्या खोडवा ऊसावर खोडकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. 
  • लागवडीच्या ऊसाचे उत्पादन एकरी ४० टन आणि ऊस संख्या एकरी ४०,००० पेक्षा जास्त असलेल्या ऊसाचाच खोडवा ठेवावा. पीक विरळ झाल्यास रोपे लावून नांग्या भराव्यात. 
  • खोडवा ठेवावयाची जमीन सुपिक आणि निचर्‍याची असावी. खोडवा पीक हे हलक्‍या, कमी खोलीच्या तसेच निचरा न होणाऱ्या क्षारपड, चोपण जमिनीत घेऊ नये 
  • खोडवा पीक १२ ते १४ महिने वयाचे असताना ऊसाची तोड होणार असेल तरच खोडवा ठेवावा. 
  • शिफारशीत ऊस जातीचाच खोडवा ठेवावा. 
  • काणी व गवताळ वाढ या रोगांचा खोडवा ऊसातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी उष्ण बाष्फ प्रक्रिया केलेल्या त्रिस्तरीय बेणेमळ्यातील शुद्ध बेणे बावीस्टीनची बीजप्रक्रिया करून ऊस लागणीसाठी वापरावे, दर ३-४ वर्षांनी बेणे बदल करावा. 
  • खोडव्यामध्ये पाचटाचा आच्छादन म्हणून प्रभावीरित्या वापर करण्यासाठीची पूर्वतयारी ऊस लागणीपासूनच करायला हवी. यासाठी उसाच्या दोन सर्‍यांमधील अंतर कमीत कमी १.२ मीटर (४ फूट) असावे किंवा जमिनीच्या मगदुरानुसार रुंद सरी अथवा जोडओळ पद्धतीने ऊसाची लागण करावी. म्हणजे पट्ट्यात पाचट चांगले बसते व फूट चांगली होते.

    कृषिक अँप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post