पूर्वहंगामी ऊस
को ८६०३२, फुले २६५ या मध्यम पक्व होणाऱ्या आणि फुले १०००१, को ९४०१२, को.सी. ६७१, व्हीएसआय १२१२१ आणि कोल्हापूर विभागासाठी को ९२००५ या सुधारीत जातींची निवड करावी. बेणे मळ्यातील ९ ते ११ महिने वयाचे अनुवांशिकदृष्ट्या शुद्ध, रोग आणि कीड मुक्त बेणे वापरावे. बेणे लांब कांड्याचे व फुगीर डोळ्याचे, रसरशीत असावे. दर तीन वर्षांनी बेणे बदलावे.
आडसाली ऊस
लागवडीनंतर ६ ते ८ आठवड्यांत उसास फुटवे येण्यास सुरवात होते. फुटव्यांची वाढ अधिक जोमदार व्हावी म्हणून नत्रयुक्त खताचा दुसरा हप्ता म्हणजे शिफारशीच्या ४० टक्के नत्राची मात्रा (६४ किलो नत्र = १३९ किलो नीमकोटेड युरिया) द्यावी. नत्राची दुसरी मात्रा देताना कृषिराज औजार चालवून खत जमिनीत चांगले मिसळावे. पीक १२ ते १४ आठवड्यांचे झाल्यानंतर उसास कांड्या सुटण्यास मदत होते. त्या वेळी नत्रयुक्त खताचा तिसरा हप्ता म्हणजे शिफारशीच्या १० टक्के नत्राची मात्रा (१६ किलो नत्र = ३५ किलो नीमकोटेड युरिया) देऊन बाळबांधणी करावी. यासाठी निम्मा वरंबा लोखंडी नांगराच्या सहाय्याने फोडून ऊसास हलकी भर द्यावी. भर दिल्यामुळे उसाला नंतर फुटवे फुटण्यास प्रतिबंध होतो. को ८६०३२ ही जात रासायनिक खताला जास्त प्रतिसाद देते. त्यामुळे या जातीसाठी २५ टक्के रासायनिक खतांची मात्रा जास्त वापरावी.
हे पण वाचा: आडसाली ऊस खत व्यवस्थापन आणि सुरु ऊस पाणी नियोजन.
सुरु ऊस
जमिनीत पावसाचे पाणी साचून राहिलेले असल्यास चर काढून बाहेर काढून द्यावे. जर ऊस पडलेला किंवा कललेला असेल, तर दोन ओळींतील ऊस एकमेकांना बांधून आधार द्यावा. सरीतील पाणी ओसरताच, ऊस पिकास २० किलो युरिया व २० किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति एकर या प्रमाणे बुस्टर डोस द्यावा. ठिबक सिंचनाची सोय असेल, तर खते ठिबक सिंचनाच्या माध्यमातून द्यावीत. वाफसा येताच उसाच्या बुडख्यास मातीची भर द्यावी.