कृषी सल्ला:- खरीप कांद्याची रोपवाटीका व वेल वर्गीय पिके संजीवके वापर.

 

कांदा-लसुण :-

खरीप कांद्याच्या रोपवाटिकेकरिता पेरणी केली नसल्यास आणखी उशीर न करता त्वरित करावी. एक एकर लागवडीसाठी साधारणपणे २ गुंठे जागेत रोपवाटिका (२ ते २.५ किलो बियाणे) करावी. मशागतीवेळी खोल नांगरट करून घ्यावी. त्यामुळे कीटकांचे कोष व तणांच्या बिया सूर्यप्रकाशात उघड्या पडून नष्ट होतात. वाफेनिर्मितीपूर्वी आधीच्या पिकांची धसकटे, काडीकचरा, तणे व दगड काढून टाकावेत. दोन गुंठे क्षेत्रामध्ये वाफे तयार करण्यापूर्वी दोन क्विंटल चांगले कुजलेले शेणखत घालावे. गादीवाफे १०-१५ सें.मी. उंच, १ मीटर रुंद, सोईनुसार लांब तयार करावेत. रोपवाटीकेतील तणनियंत्रणासाठी पेंडीमिथॅलिन ३ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारावे. मातीतून पसरणाऱ्या रोगांच्या प्रतिबंधासाठी पेरणीपूर्वी कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. मर रोगाच्या नियंत्रणासाठी व निरोगी रोपे मिळविण्यासाठी, ट्रायकोडर्मा व्हिरीडी ५०० ग्रॅम प्रति एकर प्रति २०० किलो शेणखतात मिसळून वापरावे. पेरणीपूर्वी नत्र १.६ किलो, स्फुरद ४०० ग्रॅम व पालाश ४०० ग्रॅम प्रति २०० वर्गमीटर या प्रमाणात खते द्यावीत. बियाणे लागवड ओळीत ५० ते ७५ मि.मी. अंतर ठेवून करावी. पेरणीनंतर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खताने बियाणे झाकावे. त्यानंतर थोडे पाणी द्यावे. पाणी देण्याकरिता ठिबक अथवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब फायद्याचा ठरतो.


कृषी सल्ला-चटई पद्धतीने रोपवाटिका व सोयाबीन खत व्यवस्थापन


- वेलवर्गीय पिके :-
वेलवर्गीय भाजीपाला पिकांवर मादी फुले आणि नर फुले एकाच वेलीवर परंतु वेगवेगळी (मोनोसीयस) लागतात. मादी फुलांची संख्या जेवढी जास्त तेवढी फळे जास्त प्रमाणात लागतात. त्यामुळे सुरवातीच्या अवस्थेत मादी फुले जास्त लागणे गरजेचे असते. त्यासाठी वेलीवर पुढीलप्रमाणे संजीवके फवारावीत : पिके दोन पानांची असताना - जिबरेलीक आम्ल २५ पीपीएम (२५ मिलिग्रॅम प्रति लिटर पाणी ) पिके चार पानांची असताना - नॅप्थील अॅसेटीक ॲसिड १० पीपीएम (१० मिलिग्रॅम प्रति लिटर पाणी)

 




कृषिक अँप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लीक करा.

 
Post a Comment (0)
Previous Post Next Post