उन्हाळ्यात नांगरणी, कुळवणी तसेच पावसाळ्याच्या सुरुवातीस शेतकामांसाठी बैलजोडीचा वापर होतो.
या काळात अतिश्रमामुळे बैलांमध्ये खांदेसूजी दिसून येते. हा आजार टाळण्यासाठी खडबडीत पृष्ठभाग असणारे जू बदलावे. समान उंचीची बैलजोडी कामास जुंपावी. दोन्ही बैलांच्या खांद्यावर पडणारे वजन समान असावे. बैलांना भरपूर काम न देता थोड्या-थोड्या विश्रांतीने काम द्यावे. बैलांना सतत कामाचा ताण देऊ नये. जनावरांना अचानक जास्त प्रमाणात शेतकामास जुंपू नये. बैलगाडीत जास्त वजन भरून ओढायला लाऊ नये. कच्च्या, खराब रस्त्यावर जास्त वजन असणारी गाडी नेऊ नये. खांदेसूज लक्षात घेऊन तातडीने उपचार करावेत. नुकत्याच सुजलेल्या भागावर ४ ते ५ दिवस खांदेसूज कमी करणारे मलम लावावे. ताज्या सुजेत बर्फाने ३ ते ४ दिवस शेकावे. मॅग्नेशियम सल्फेट ग्लिसरीनमध्ये मिसळून खांद्यावर लावल्यास नुकतीच आलेली सूज कमी होते.जुन्या सुजेत गरम वाळू कपड्यात गुंडाळून किंवा गरम पाण्याने खांद्यास ४ ते ५ दिवस शेक द्यावा. शेक देताना जनावरास पोळणार नाही याचीखात्री करावी. गरम पाणी किंवा वाळूचे तापमान आपल्या शरीराच्या तापमानापेक्षा थोडे जास्त असावे. खांद्यावर आलेल्या गाठी मऊ पू असणाऱ्या असल्यास पशुवैद्यकाकडून छोटी शस्त्रक्रिया करून त्यातील पू काढून टाकावा, त्याचे रोज ड्रेसिंग करावे. उपचार करत असताना बैलाला कामाला जुंपू नये, पूर्णपणे आराम द्यावा. औषधोपचाराने खांद्यावरील गाठी कमी होत नसतील, तर खांद्यावर पशुवैद्यकाकडून छोटीशी शस्त्रक्रिया करून त्या काढून टाकाव्यात. त्यानंतर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार व काळजी घ्यावी.