कृषी सल्ला -टोमॅटो ,कांदा लसुण ,कोबी वर्गीय पिके,वेल वर्गीय पिके

टोमॅटो

टोमॅटो पुनर्लागवडीनंतर आवश्‍यकतेनुसार खुरपण्या करून ठेवावे. टोमॅटोच्या पिकात तणनाशकाचा वापर करावयाचा झाल्यास रोपांच्या पुनर्लागवडीपूर्वी कोरड्या वाफ्यात पेंडिमिथॅलिन (३० इसी) ८०० मिलि प्रति एकर या प्रमाणात फवारणी करावी. फवारणीनंतर पाणी देऊन पुनर्लागवड करावी. अन्यथा लागवडीनंतर १६ ते २० दिवसांनी मेट्रीब्युझीन (७० डब्ल्यूपी) या तणनाशकाची ३०० ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात नॅपसॅक पंपाने फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझलच्या साह्याने तणांवर फवारणी करावी. फवारणीवेळी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा.

कोबी वर्गीय पिके

कोबी आणि फुलकोबी लागवडीसाठी मध्यम ते भारी पोयट्याची सुपीक आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. कोबी लागवडीसाठी जमिनीचा सामू ६ ते ६.५ असावा. तर फुलकोबी लागवडीसाठी जमिनीचा सामू ५.५ ते ६.६ असावा. कोबीवर्गीय पिकांचे बी बारीक असल्यामुळे गादीवाफ्यावर रोपे तयार करून त्यांची पुनर्लागवड करावी. रोपवाटिकेसाठी साधारणतः ३ x १ x ०.१५ मीटर आकाराचे गादीवाफे तयार करावेत. प्रति गादीवाफ्यात वरच्या थरात शेणखत २० किलो,२०:२०:२० हे मिश्रखत ५० ग्रॅम, निंबोळी पावडर २ किलो, फोरेट (१० जीआर) २० ग्रॅम मिसळावे. एक एकर क्षेत्रासाठी ८ ते १० वाफे पुरेसे होतात. वाफ्याच्या रुंदीच्या समांतर ५ ते ७ सेंमी अंतरावर १ सेंमी खोल रेषा हाताने पाडून बियाणे पातळ पेरावे. मातीने झाकून झारीने हलकेसे पाणी द्यावे. साधारणपणे तीन ते पाच आठवड्यांत रोपे लागवडीसाठी तयार होतात. एक एकर लागवडीसाठी कोबीच्या संकरित वाणांचे ८० ते १०० ग्रॅम तर फुलकोबीच्या संकरीत वाणांचे १०० ते १२० ग्रॅम बियाणे लागते. कोबीवर्गीय पिकांवर घाण्या (ब्लॅकरॉट) या अतिशय नुकसानकारक जीवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो. तो टाळण्यासाठी पेरणीपूर्वी स्ट्रेप्टोमायसीन ०.२ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात बियाणे ३० मिनिटे भिजत ठेवावे. त्यानंतर बियाणे सावलीत सुकवून पेरणीसाठी वापरावे.

वेल वर्गीय पिके

वेलवर्गीय भाजीपाला पिकांना आधार देण्याची ताटी पद्धत - या पद्धतीमध्ये ६ x ३ फुटांवर वेलवर्गीय भाज्यांची लागवड करतात. यासाठी रीजरच्या साह्याने ६ फूट अंतरावर सरी पाडावी. प्रत्येक २५ फूट अंतरावर आडवे पाट तयार करावेत. सऱ्यांच्या लांबीच्या दोन्ही टोकाला १० फूट उंचीचे व ४ इंच जाडीचे डांब शेताच्या बाहेरच्या बाजूला झुकतील या पद्धतीने दोन फूट जमिनीत गाडावेत. त्यांना दोन्ही बाजूंना १० गेजच्या तारेने ताण द्यावेत. नंतर प्रत्येक ८ ते १० फुटांवर आठ फूट उंचीचे दीड इंच जाडीचे बांबू अडीच इंच जाडीच्या लाकडी बल्या जमिनीत गाडून उभ्या कराव्यात. लावलेल्या वेलामध्ये उभे केलेले बांबू किंवा डांब आणि कडेचे लाकडी डांब एका सरळ रेषेत येतील याची काळजी घ्यावी. नंतर १६ गेज जाडीची तार जमिनीपासून दोन फूट उंचीवर, दुसरी तार जमिनीपासून सहा फूट उंचीवर ओढावी. त्यानंतर वेलींची दोन फूट उंचीवर बगलफूट व ताणवे काढून वेल सुतळीच्या साह्याने तारेवर चढवावेत. बांबू आणि ताराऐवजी शेवरी किंवा इतर जंगली लाकडाचा वापर केल्यास खर्च कमी होऊ शकेल; परंतु ते साहित्य एका हंगामासाठीच उपयोगी पडेल. बांबू आणि तार जवळजवळ तीन हंगामांसाठीच वापरता येतात. त्या दृष्टीने विचार केला तर बांबू आणि तारा यांची ताटी केव्हाही स्वस्त पडेल.

कांदा-लसूण

कांदा बीजोत्पादनाच्या उभ्या पिकाकरीता - फुले उमलल्यानंतर बुरशीनाशक किंवा कीटकनाशक यांची फवारणी टाळावी; अन्यथा मधमाश्‍यांना हानी पोचते. अत्यंत आवश्यक असेल तरच हाताने खुरपणी करावी. खुरपणी करताना फुलदांड्यांना हानी पोहचणार नाही याची काळजी घ्यावी. मधमाश्‍यांची संख्या कमी झाल्यास एकरी एक-दोन मधमाश्‍यांच्या पेट्या शेतामध्ये कांद्याची फुले उमलल्यानंतर ठेवाव्यात. पिकास जमिनीचा मगदूर, तापमान यांचा विचार करून १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. सामान्यतः बियांचे गोंडे काढणीला आल्यावर त्यांचा रंग तपकिरी होतो. बियांचे वरचे आवरण फाटून त्यात काळपट बी दिसू लागते. गोंड्यात ५० टक्के बी काळपट दिसू लागल्यास गोंडे काढायला सुरवात करावी. सर्व गोंडे एकदम तयार होत नाही. ते जसजसे तयार होतील तसतसे काढून घ्यावेत. साधारणपणे ३ ते ४ वेळा गोंड्यांची काढणी हाताने करावी लागते. गोंडे ओढून न काढता खुडून काढावेत. गोंडे काढल्यानंतर ताडपत्रीवर पसरवून ५ ते ६ दिवस उन्हात चांगले सुकवून घ्यावेत. चांगल्या प्रकारे सुकलेल्या गोंड्यातून बी काठीने हळूहळू कुटून वेगळे करावे. त्यानंतर उफणणी करून बी स्वच्छ करावे. हलके, फुटलेले व पोचट बी वेगळे करून उत्तम प्रतीचे बियाणे एकत्र करावे. मळणी केलेले बी स्वच्छ केल्यानंतर पुन्हा उन्हात पातळ पसरवून सुकू द्यावे. साठवणीसाठी बियांमध्ये ६ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता नसावी. बियाणे ४०० गेजच्या पॉलिथिन पिशव्यांमध्ये भरून ठेवावे.

कृषिक अँप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post