डॉ. अशोक पिसाळ, विस्तार कृषिविद्यावेत्ता, विभागीय विस्तार केंद्र, डॉ. बापूराव गायकवाड, वरिष्ठ संशोधन अधिकारी, इंजि. गजानन नेवकर, कनिष्ठ संशोधन अधिकारी, प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर
पौराणिक आयुर्वेदिक ग्रंथ सुश्रुत संहिता व चरकसंहिता यामध्ये गुळाचे औषधी गुणधर्म नमूद केलेले असून प्राचीन काळापासून गूळ भारतात वापरला जातो. दर्जेदार गुळास बाजारभाव चांगला मिळतोच आणि ग्राहकांचे मन पिवळाधमक सोनेरी रंगाच्या गुळाने आकर्षिले जाते. ग्राहकाच्या पसंतीनुसार उत्तम प्रतीच्या आणि आरोग्यदायी गुळाची निर्मिती करावयाची असल्यास सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब अगदी ऊस लागणीपासूनच करणे गरजेचे आहे.
ऊस तोडणीपूर्वीचे तंत्रज्ञान
- जमीनऊस पिकासाठी चांगल्या निचऱ्याची, क्षारांचे प्रमाण कमी असणारी व पीक पोषक घटकांची उपलब्धता योग्य प्रमाणात असणारी जमीन निवडावी. अशा जमिनीत उसाची वाढ चांगली होते व त्यापासून चांगल्या प्रतीचा गूळ तयार करता येतो. खारवट, चोपण, चुनखडीयुक्त जमिनीतील उसापासून दर्जेदार गूळ होत नसल्याने अशा जमिनीतील ऊस, गूळ आणि काकवी तयार करण्यासाठी वापरू नये.
- उपयुक्त ऊस वाणगुळाची प्रत आणि रंग हे गुणधर्म मुख्यत्वेकरून उसाच्या जातीवर अवलंबून असतात. प्रत्येक ऊस जातीमधील रसाच्या रासायनिक गुणधर्मात फरक आढळून येतो व या रासायनिक गुणधर्माचा गुळाच्या प्रतीवर परिणाम होतो. सध्या कोल्हापूर विभागात को ९२००५ हा वाण मोठ्या प्रमाणात वापरला जातो. तथापि गुळासाठी शिफारस केलेल्या खाली नमूद केलेल्या ऊस जातींपैकी आपल्या लागण हंगामानुसार योग्य वाणाची निवड करावी.
लवकर पक्व होणाऱ्या जाती : कोसी ६७१, को ८०१४, को ७२१९, को ९२००५
मध्यम उशिरा ते उशिरा पक्व होणारे वाण : को एम ७१२५, को ८६०३२, को ७५२७, को ९४०१२
- खतांचा संतुलित वापरउत्तम प्रतीचा गूळ तयार करण्यासाठी मातीचे पृथःकरण करून अन्नद्रव्य उपलब्धतेनुसार योग्य त्या सेंद्रिय व रासायनिक खतांचा उसाच्या वाढीच्या अवस्थेनुसार संतुलित वापर करणे गरजेचे आहे. सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत सुधारून अन्नांशाची उपलब्धता वाढते आणि उसाची वाढ चांगली होते. त्यामुळे रसाची प्रत सुधारून चांगला गूळ तयार होतो. याकरिता हेक्टरी ५० गाड्या चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत घालावे. रासायनिक खताची शिफारस केल्याप्रमाणे सुरू ऊस पिकास हेक्टरी २०० किलो नत्र, ११५ किलो स्फुरद आणि ११५ किलो पालाश द्यावे. पूर्व हंगामी ऊस पिकास प्रति हेक्टरी २७२ किलो नत्र, १७० किलो स्फुरद, आणि १७० किलो पालाश द्यावे. शिफारशीपेक्षा जास्त नत्रयुक्त खते दिल्यास गुळाची प्रत खराब होऊन उताराही घटतो व गुळाच्या टिकाऊपणावर ही अनिष्ट परिणाम होतो. स्फुरदयुक्त रासायनिक खते योग्य प्रमाणात दिल्यास रसाची प्रत सुधारते. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या योग्य वापरामुळेसुद्धा गुळाची प्रत सुधारण्यास मदत होते.
अधिक कृषिक अँप मध्ये वाचा……..