रब्बी पिक सल्ला | krushik app |

हरभरा 
बागायती हरभऱ्यामध्ये खुरपणी किंवा कोळपणी करून जमीन भुसभुशीत करून घ्यावी. 
घाटे अळीच्या प्रादुर्भावाचा आगाऊ अंदाज येण्यासाठी एकरी २ कामगंध सापळे दर ५० मीटर अंतरावर शेतात उभारावेत. दर १५ दिवसांनी त्यातील ल्युर बदलावेत. घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसताच निंबोळी अर्क ५ टक्के किंवा ॲझाडिरेक्टीन (३०० पी.पी.एम.) ५ मिलि प्रति लिटर 
पाणी या प्रमाणे फवारणी करावी. ज्या ठिकाणी जिरायती हरभऱ्यात मोठ्या अवस्थेतील घाटे अळी आढळून येत असल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.२५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे एकरी २०० लिटर द्रावण फवारावे. १५ डिसेंबरनंतर हरभऱ्याची लागवड आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत नाही, त्यामुळे लागवड करणे टाळावे.

गहू    
उशिरा पेरणी झालेल्या गव्हामध्ये खोडमाशी या किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळतो.
ढगाळ हवामान किडीस पोषक असते. किडीची अळी दवबिंदूतील ओलाव्याच्या मदतीने पोंग्यात शिरून गाभा खाते. त्यामुळे रोप मर तसेच फुटवे मर दिसून येते. पूर्ण वाढ झालेली अळी ८ ते १० मिमि लांब असून पिवळसर रंगाची असते.मृत पोंगा ओढल्यास तळाशी खोडमाशीची अळी दिसून येते. पोंगेमर किंवा 
फुटवे मर दिसून आल्यास, ॲझाडिरेक्टीन (नीमयुक्त कीटकनाशक) १ मिलि किंवा क्विनॉलफॉस (२५ इसी) १.५ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून 
१ ते २ फवारण्या कराव्यात.

रब्बी ज्वारी
रब्बी हंगामातील ज्वारी पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. 
खोडमाशी ही घरमाशीप्रमाणेच दिसत असली, तरी आकाराने लहान असते. रंग काळपट 
राखाडी असून, तिच्या पृष्ठभागावर खालच्या बाजूने ४ ते ५ ठिपके असतात.या किडींचा प्रादुर्भाव फक्त रोपावस्थेतच आढळून येतो. अंड्यातून निघालेली अळी रोपाच्या बुडापर्यंत जाऊन खोडाला छिद्र पाडते. आत शिरून वाढणाऱ्या पोंग्यावर उपजीविका करते. सुरुवातीला मधला वाढणारा रोपाचा भाग पिवळसर पडून नंतर तो मरून जातो. यालाच पोंगेमर असे म्हणतात. लहान रोपे या किडीच्या प्रादुर्भावामुळे 
पूर्णत: मरून जातात, तर मोठ्या रोपांना बाजूने फुटवे फुटून उत्पादनात घट येते. या किडीचा प्रादुर्भाव उशिरा पेरणी झालेल्या ठिकाणी जास्त प्रमाणात आढळतो. ढगाळ वातावरणामुळे बागायती क्षेत्रात या किडीची वाढ झपाट्याने झाल्याचे आढळून येते. 
प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा (१० टक्के अंडी असलेली झाडे किंवा १० टक्के पोंगेमर झालेली झाडे) जास्त असल्यास, नियंत्रणासाठी सायपरमेथ्रीन (१० इसी) २ मिलि किंवा डेल्टामेथ्रीन (२.८ इसी) १.२५ मिलि किंवा क्विनॉलफॉल (२५ इसी) २ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

Post a Comment (0)
Previous Post Next Post