|खरीब पिक सल्ला| - (कापूस,सोयाबीन, तूर)- krushikapp

कापूस:- 

बीटी कपाशीस मुख्य अन्नद्रव्यांच्या मात्रेबरोबरच काही सूक्ष्म अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. याकरिता मातीमध्ये मॅग्नेशियम, झिंक, बोरॉन यापैकी एखाद्या अन्नद्रव्याची कमतरता असल्यास मॅग्नेशियम सल्फेट ८ किलो/एकर, झिंक सल्फेट १० किलो/एकर व बोरॉन २ किलो/एकर आवश्यकतेनुसार जमिनीतून द्यावेत. सूक्ष्म अन्नद्रव्ये शेणखतामध्ये मिसळून पेरणीपूर्वी किंवा पेरणीनंतर एक महिन्यातच द्यावीत. रासायनिक खतासोबत सूक्ष्म अन्नद्रव्ये देऊ नयेत. मॅग्नेशियम सल्फेट ०.२ टक्के (२ ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी फुले लागणे व बोंडे पक्व होण्याच्या वेळी करावी.


सोयाबीन 
सोयाबीन पिकावरील खोड माशी या किडीच्या अंडी, अळी, कोष आणि प्रौढ अशा चार अवस्था असतात. प्रौढ माशी आकाराने लहान, काळसर आणि चमकदार, २ मिमी लांब असते. प्रौढ मादी तिच्या संपूर्ण आयुष्यामध्ये ७० ते ८० अंडी घालते. अंड्यातून निघालेली अळी पाय नसलेली, २-४ मिमी लांब असते. अळी सोयाबीनची पाने पोखरून नंतर पानाच्या देठातून मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करते. खोडाचा आतील भाग पोखरून खाते. या किडीचा प्रादुर्भाव पिकाच्या रोपावस्थेत झाल्यास कीडग्रस्त झाड वाळते. परिणामी दुबार पेरणी करणे भाग पडते किंवा उत्पादनात लक्षणीय घट येते. मोठ्या झाडांवर प्रादुर्भाव झाल्यास झाडावर खोडमाशीच्या अळीने प्रौढ माशीला बाहेर येण्यासाठी केलेले छिद्र आढळते. खोडमाशीच्या अळी आणि कोष अवस्था फांद्यात किंवा खोडातच पूर्ण होते. अशा प्रादुर्भावग्रस्त झाडावरील फुलांची गळ होते. उत्पादनात १६ ते ३० टक्क्यांपर्यंत घट येते. खोडमाशीच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त पाने, फांद्या आणि पानाच्या देठांचा अळीसह नायनाट करावा. प्रतिबंधक उपाययोजना म्हणून निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा अ‍ॅझाडीरेक्टिन (१०,००० पीपीएम) ३ मिलि प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी. आर्थिक नुकसानीची पातळी (१० टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे) ओलांडल्यास, ट्रायझोफॉस (४० ईसी) १.२ मिलि किंवा इथिऑन (५० ईसी) ३ मिलि किंवा क्लोरअँट्रानीलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

तूर 

कोरडवाहू क्षेत्रात तुरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. हे पीक पाण्यासाठी अतिसंवेदनशील आहे. जमिनीतील कमी ओल व फुले लागल्यानंतर पाण्याचा ताण बसल्यास या पिकात मोठ्या प्रमाणात फूलगळ होते. तुरीला गरजेनुसार व पीकवाढीच्या अवस्थेनुसार पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. यादृष्टीने ठिबक सिंचनाद्वारे तूर पिकात पाणी व्यवस्थापन करणे फायदेशीर आहे. पाणी व्यवस्थापनासोबतच विद्राव्य रासायनिक खतांचे नियोजन उपयुक्त ठरते. ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खते दिल्यास त्यांची कार्यक्षमता ९५ टक्क्यांपर्यंत वाढते. तसेच २५ टक्क्यांपर्यंत त्यांच्यात बचत होऊन उत्पादनात वाढ होते. तुरीचे अधिक उत्पादन व रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे तूर पिकास शिफारसीच्या १२५ टक्के नत्र (१२.५ किलो/एकरी), १०० टक्के स्फुरद (२० किलो/एकरी फॉस्फोरिक आम्लाच्या माध्यमातून) आणि १०० टक्के पालाश (१२किलो/एकरी) पाच वेळा विभागून द्याव्यात. ☆खतमात्रा आणि कालावधी १० टक्के शिफारशीत नत्र, स्फुरद व पालाश- पेरणीच्या वेळी २० टक्के शिफारशीत नत्र, स्फुरद व पालाश- पेरणीनंतर ४० दिवसांनी २० टक्के शिफारशीत नत्र, स्फुरद व पालाश- पेरणीनंतर ६० दिवसांनी २५ टक्के शिफारशीत नत्र, स्फुरद व पालाश- पेरणीनंतर ८० दिवसांनी २५ टक्के शिफारशीत नत्र, स्फुरद व पालाश - पेरणीनंतर १०० दिवसांनी

Post a Comment (0)
Previous Post Next Post