पिक सल्ला- (कापूस,सोयाबीन,तूर व मका)-Krushik app

     
पिक सल्ला- (कापूस,सोयाबीन,तूर व मका)-Krushik app
कापूस: कपाशीमध्ये मित्रकीटकांच्या संवर्धनासाठी शक्यतोवर पेरणीनंतर दोन महिन्यांपर्यंत कीटकनाशकांचा वापर टाळावा. या काळात मित्रकीटक कापसाच्या शेतामध्ये बहुसंख्येने स्थिर होतील. परभक्षक कीटक ढालकिडा, हरित पंखी क्रायसोपा, कोळी आणि परोपजीवी कीटक ऑनासीयस, अ‍ॅनागायरस, मावा परजीवी गांधीलमाशी कापसामधील तुडतुडे, मावा, फुलकिडे, पांढरी माशी यासारख्या रसशोषक किडींची संख्या मर्यादित राखण्यास मदत करतात. नीम तेल, एरंडी तेल, मासोळी तेलयुक्त वनस्पतीजन्य आणि जैविक कीटकनाशकांचा (लिकॅनीयम लिकॅनी) वापर करावा. कमी विषारी असणाऱ्या कीटक वाढनियंत्रके, कीटकनाशके (उदा. बुप्रोफेजीन, स्पायरोमेसिफेन, डायफेन्थूरॉन) यांचा पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी वापर करावा. कमी नुकसानकारक दुय्यम पतंगवर्गीय किडी (उदा. पाने गुंडाळणारी अळी, उंट अळी) यासाठी रासायनिक फवारणी शक्यतो टाळावी. या अळ्या कापसाच्या झाडाला फारच कमी इजा पोचवतात, त्यामुळे परोपजीवी कीटकांना (उदा. ट्रायकोग्रामा, अपेंटालीस आणि सिसिरिपा) इजा पोचणार नाही. हे कीटक अमेरिकन बोंड अळीच्या नैसर्गिक नियंत्रणाचे काम करतात. पर्यावरणासाठी अति विषारी (वर्ग १) कीटकनाशके (उदा. मिथाईल पॅराथियॉन, मोनोक्रोटोफॉस, डायक्लोरव्हॉस, मिथोमील, फोरेट, ट्रायझोफॉस, ऑक्झिडिमेटॉन मिथाईल) यांचा वापर टाळावा. ही कीटकनाशके पर्यावरणाच्या व मित्रकीटकांच्या दृष्टीने हानिकारक ठरतात. कीटकनाशकांच्या मिश्रणाचा वापर टाळावा. मिश्रणाचा वापर पर्यावरणास अनुकूल नाही.


पिक सल्ला- (कापूस,सोयाबीन,तूर व मका)-Krushik app
सोयाबीन : सोयाबीन पेरणीकरिता मध्यम काळी पोयट्याची, चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. पेरणी १५ जून ते १५ जुलै दरम्यान वापशावर करावी. भारी जमिनीत पेरणी ४५ x ५ सेंमी आणि मध्यम जमिनीत ३० x ७.५ सेंमी अंतरावर करावी. सलग पेरणीकरिता २८-३० किलो प्रति एकर तर टोकण करण्याकरिता १८-२० किलो प्रति एकरी बियाणे वापरावे. पेरणीकरिता जे.एस. ३३५, एम.ए.सी.एस. ११८८, फुले कल्याणी (डी.एस. २२८), जे.एस. ९३०५, के.एस. १०३, फुले अग्रणी (के.डी.एस. ३४४) आणि फुले संगम (के.डी.एस. ७२६) या जातींची निवड करावी. प्रति किलो बियाण्यास २५ ग्रॅम रायझोबियम व २५ ग्रॅम पीएसबी या जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. आंतरपिकामध्ये सोयाबीन + तूर (२:१, ३:१) या प्रमाणात घेता येऊ शकते. सोयाबीन पिकास एकरी २० किलो नत्र (४४ किलो युरिया), ३० किलो स्फूरद (१८८ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि १८ किलो पालाश (३० किलो म्युरेट ऑफ पोटॅश) पेरणीच्या वेळी द्यावे. खते पेरणीपूर्वी जमिनीत मिसळून द्यावीत अथवा दोन चाड्याच्या पाभरीने खते व बियाणे एकाच वेळी पेरून द्यावे.

पिक सल्ला- (कापूस,सोयाबीन,तूर व मका)-Krushik app
तूर : तूर पेरणीकरिता लवकर तयार होणारे आयसीपीएल ८७, विपुला, फुले राजेश्वरी, बीडीएन ७११ या जातींची निवड करावी. लागवडीसाठी ९० x ६० सेंमी अथवा १८० x ३० सेंमी अंतर ठेवावे. याशिवाय बीएसएमआर ७३६, बीएसएमआर ८५३ हे मध्यम उशिरा येणाऱ्या जातींची निवड करावी. प्रति किलो बियाण्यास २५ ग्रॅम रायझोबियम व २५ ग्रॅम पीएसबी या जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. एकरी जातीपरत्वे ४-५ किलो बियाणे वापरावे. टोकण पद्धतीने पेरणी केल्यास बी कमी लागेल. पेरणी करतेवेळी प्रति एकरी १० किलो नत्र व २० किलो स्फुरद म्हणजेच ५० किलो डी.ए.पी. वापरावे. जमिनीच्या पृथःकरणात पालाशची कमतरता आढळल्यास एकरी १२ किलो पालाश (२० किलो म्युरेट ऑफ पोटॅश) वापरावे.

पिक सल्ला- (कापूस,सोयाबीन,तूर व मका)-Krushik app
मका : अमेरिकन फॉल आर्मी वर्म (लष्करी अळी) प्रतिबंधासाठी हंगाम संपल्यानंतर शेतामधील पिकाचे अवशेष नष्ट करावेत. भुईमूग किंवा सूर्यफुल सारख्या पिकांबरोबर फेरपालट करावी. जमिनीची खोल नांगरट करावी. पेरणी वेळेवर करावी. टप्प्याटप्प्याने पेरणी टाळावी. शेत तणमुक्त ठेवावे. रासायनिक खताचा अतिरेकी वापर टाळावा. मक्यामध्ये तूर, उडीद, मूग यांचे आंतरपीक घ्यावे. सायअॅन्ट्रानिलीप्रोल (१९.८ टक्के) अधिक थायमेथोक्झाम (१९.८ टक्के) हे संयुक्त कीटकनाशक ४ मिलि प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
कृषिज्ञाचे मार्गदर्शन व कृषि विषयक सल्ला मिळवण्यासाठी आजच खालील बटन वर क्लिक करून कृषिक अॅप अपडेट / डाऊनलोड करा 📲📲
    


       

Post a Comment (0)
Previous Post Next Post