कांदा :-
खरीप हंगामात एक एकर क्षेत्रावर लागवडीसाठी रोपांच्या उपलब्धतेसाठी सुमारे २ गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका तयार करावी. त्यासाठी २-३ किलो बियाणे लागते. रोपवाटिकेसाठी जमीन तयार करताना प्रथम खोल नांगरट करावी. त्यामुळे कीटकांचे कोष व तणांच्या बिया सूर्यप्रकाशात उघड्या पडून नष्ट होतात. वाफे तयार करण्यापूर्वी पूर्वीच्या पिकाची धसकटे, काडीकचरा, तण आणि दगड काढून टाकावे. २०० किलो चांगले कुजलेले शेणखत घालावे. मर रोगाचे नियंत्रण करून निरोगी रोपे मिळवण्यासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी ५०० ग्रॅम प्रति २०० किलो कुजलेल्या शेणखतात मिसळून वापर करावा. गादीवाफे १०-१५ सेंमी उंच, १ मीटर रुंद आणि सोयीनुसार लांब तयार करावेत. तणांच्या बंदोबस्तासाठी पेंडीमिथॅलीन २ मिलि प्रतिलिटर या प्रमाणात फवारावे. मातीतून पसरणाऱ्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी पेरणीपूर्वी कार्बेंडाझिम २ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी दोन गुंठे क्षेत्रासाठी नत्र २ किलो, स्फुरद ८०० ग्रॅम, पालाश ४०० ग्रॅम या प्रमाणात खतमात्रा द्यावी. बियाण्याची लागवड ओळींमध्ये ५ सेंमी किंवा ७.५ सेंमी अंतर ठेवून करावी. पेरणीनंतर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खताने बियाणे झाकावे. त्यानंतर थोडे पाणी द्यावे. पाणी देण्याकरिता ठिबक अथवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करणे फायद्याचे ठरते.
टोमॅटो :-
उष्ण व कोरड्या हवामानात लाल कोळी या किडीचा जास्त प्रादुर्भाव आढळतो. झाडाच्या वाढीच्या सर्व अवस्थेत किडीचा प्रादुर्भाव आढळतो. लाल कोळी हे सूक्ष्म अष्टपाद प्राणी असून साधारणतः १ मिमी पेक्षा लहान असतात. टोमॅटोव्यतिरिक्त बटाटे, वांगी, भेंडी व वेलवर्गीय भाजीपाला पिके ही लाल कोळी किडीची यजमान पिके आहेत. लाल कोळी किडीची पिल्ले व प्रौढ पानावर ओरखडे ओढून त्यातून रस पितात. त्यामुळे पानातील हरितद्रव्य कमी होऊन पाने पिवळी पडतात. तसेच पानावर जाळी होते आणि झाडाची वाढ खुंटते. या किडीच्या प्रतिबंधासाठी रोपवाटिका तयार करताना मातीमध्ये निंबोळी पेंड मिसळावी. पुनर्लागवडीवेळी निंबोळी पेंड एकरी १६० ते २०० किलो वापरावी. लाल कोळीच्या जैविक नियंत्रणासाठी व्हर्टीसीलीयम लेकॅनी आणि मेटारायझीअम अॅनीसोप्ली या जैविक कीटकनाशकाची ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणात संध्याकाळच्या वेळी फवारणी करावी. निंबोळी अर्क ४ टक्के (४ किलो निंबोळी १०० लिटर पाणी) फवारणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी फेनाझाक्वीन (१० इसी) २ मिलि किंवा स्पायरोमेसिफेन (२२.९ एससी) १.२ मिलि अधिक चांगल्या प्रतीचे स्टीकर १ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. नत्रयुक्त खताचा वापर योग्य प्रमाणात करावा.
कोबीवर्गीय :-
कोबीवर्गीय पिकांमध्ये चौकोनी ठिपक्याचा पतंग (डायमंड बॅक मॉथ) या किडीचा प्रादुर्भाव अधिक दिसून येतो. या किडीची अळी पानाच्या खालच्या बाजूस राहून पानाला छिद्रे पाडून पानातील हरितद्रव्य खाते. मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यास अळी पाने खाऊन त्यांची चाळण करते. पानाच्या फक्त शिराच शिल्लक राहतात. या किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मीक नियंत्रण व्यवस्थापन करावे लागते. यासाठी लागवडीपूर्वी मुख्य पिकात आणि कडेने मोहरी पेरावी. मुख्य पिकाच्या २५ ओळींनंतर दोन ओळी मोहरी पेरावी. लागवडीपूर्वी मुख्य पिकात आणि कडेने मोहरी पेरावी. मुख्य पिकाच्या २५ ओळींनंतर दोन ओळी मोहरी पेरावी. शेतात पक्षांना बसण्यासाठी काठीचे मचाण लावावेत. एकरी पाच कामगंध (फेरोमोन) सापळे लावावेत. मोहरीवर अळ्या दिसू लागताच, डायक्लोरव्हॉस १ मिलि प्रति लिटर पाण्यातून पहिली फवारणी करावी. कोबी वा फुलकोबी पिकावर दोन अळ्या प्रतिरोप दिसू लागताच, पहिली फवारणी बॅसीलस थुरींनजिऐंसीस या जीवाणूवर आधारित कीटकनाशकाची १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून संध्याकाळच्या वेळी करावी. ट्रायकोग्रामा बॅक्ट्री मित्रकीटक प्रति एकरी ४० हजार या प्रमाणात सोडावेत. दुसरी फवारणी, निंबोळी अर्क ४ टक्के या प्रमाणात करावी. तिसरी फवारणी, इंडोक्झाकार्ब (१४.५ एससी) १ मिली किंवा स्पिनोसॅड (२.५ एससी) १ मिली प्रति लिटर पाण्यातून करावी. चौथी फवारणी, आवश्यकतेनुसार क्लोरअॅन्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.२ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात करावी.
वेलवर्गीय :-
भुरी रोगाची लक्षणे दिसून येताच, नियंत्रणासाठी डिनोकॅप (४८ इसी) ०.५ मिली किंवा हेक्झाकोनॅझोल (५ इसी) १ मिली किंवा डायफेनकोनॅझोल (२५ इसी) ०.५ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पुढील फवारणी आवश्यकतेनुसार ८ ते १० दिवसांच्या अंतराने बुरशीनाशक बदलून करावी.
कृषक अँपलिकेशन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटन क्लिक करा