भारत–अमेरिका व्यापार करार : शेतकऱ्यांसाठी धोका का?
भारत आणि अमेरिका यांच्यात नुकताच व्यापार करार झाला आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी डेअरी आणि कुक्कुटपालन क्षेत्र करारातून वगळले असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र शेती क्षेत्र या करारातून वगळलेले नाही, ही बाब शेतकऱ्यांसाठी चिंतेची ठरत आहे.
या करारानंतर सुकामेवा, ताजी व प्रक्रियायुक्त फळे, सोयाबीन तेल, सोयापेंड आणि मक्याचा भुस्सा मोठ्या प्रमाणात भारतात आयात होण्याची शक्यता आहे. यासाठी भारताला आयात कर कमी किंवा शून्य करावा लागू शकतो, त्यामुळे भारतीय बाजारपेठ परदेशी कृषी उत्पादनांसाठी खुली होणार आहे.
याचा सर्वात मोठा फटका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. यंदा सोयाबीनचा हमीभाव₹5,328 असताना बहुतांश शेतकऱ्यांनी तो ₹4,000–4,500 दरम्यान विकला. कराराच्या बातमीनंतर सोयाबीनच्या दरात सुमारे ₹500 घसरण झाली आहे. अमेरिकेतून स्वस्त सोयाबीन आणि सोयाबीन तेलाचा ओघ सुरू राहिल्यास भविष्यात हमीभाव मिळणे अवघड होईल.
मक्याच्या बाबतीतही परिस्थिती गंभीर आहे. हमीभाव ₹2,400 असतानाही बाजारात मका ₹1,500–1,700 दराने विकला गेला. अमेरिकेतून आयात होणारा मक्याचा भुस्सा पोल्ट्री व पशुखाद्य उद्योगासाठी वापरला जाईल. यामुळे पशुखाद्य स्वस्त होईल, पण देशांतर्गत मक्याच्या दरांवर दबाव येईल.
सरकार हमीभावाने खरेदी करत असल्याचा दावा करते, पण ही खरेदी अत्यंत मर्यादित आहे. मोठ्या प्रमाणात उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारात कमी दरानेच विक्री करावी लागते. त्यामुळे भारत–अमेरिका व्यापार करार शेती क्षेत्रासाठी आणि विशेषतः शेतकऱ्यांसाठी मारक ठरण्याची शक्यता आहे.
अधिक माहिती साठी आताच डाउनलोड करा कृषिक ॲप
