शाकीय वाढ पूर्ण झाल्यांनतर हळदीला फुले येण्यास सुरुवात होते. काही जातींना मोठ्या प्रमाणात तर काही जातींना कमी प्रमाणात फुलांचे दांडे येतात. हळदीला फुले येणे म्हणजे हळदीच्या शाकीय वाढीचा कालावधी संपून हळदीस कंद सुटण्यास सुरुवात झाल्याचे लक्षण आहे. फुलांचे दांडे तसेच झाडावर ठेवल्यास हळद पिकाला त्याचा कोणताही तोटा होत नाही. तसेच फुलांचे दांडे न संपणारी प्रक्रिया आहे. एकदा जरी दांडे काढले तरी नव्याने येतच राहतात. परिणामी फुलांचे दांडे काढणे ही प्रक्रिया खर्चिक ठरते. त्याचप्रमाणे फुले काढतेवेळी खोडाला इजा झाल्यास त्या भागातून दुय्यम बुरशींचा पिकात शिरकाव होतो. त्यातून कंदकूज वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे हळदीला आलेली फुले तशीच राहू द्यावीत. बाजारात काही कंपन्या हळदीचे फूल विकत घेतात. यासाठी तयार झालेले फूल, म्हणजेच फूल बाहेर पडल्यानंतर ३० दिवसांनंतर काढल्यास चालू शकते. मात्र फूल बाहेर पडल्यानंतर ३० दिवसांच्या आत ते काढल्यास त्या ठिकाणी इजा होऊन कंद सडण्याची शक्यता असते. विक्रीसाठी फूल बाहेर पडल्यानंतर लगेचच फूल काढण्याची घाई करू नये. अन्यथा कंदकूज सारख्या रोगांस आमंत्रण मिळू शकते.

