कांदा पिक
मध्यम-भारी जमिनीत लोखंडी नांगराने १५-२० सें.मी. खोल नांगरणी करावी. दोन-तीन कुळवाच्या पाळ्या देऊन मोठी ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. एकरी ६ टन चांगले कुजलेले शेणखत/ कंपोस्टखत कुळवणीद्वारे जमिनीत मिसळावे. मध्यम-भारी आणि भुसभुशीत किंवा नदीकाठच्या पोयट्याच्या जमिनीत रब्बी हंगामात सपाट वाफे पद्धतीने कांद्याची लागवड करावी. अशा वाफ्यातून सरी-वरंबा पद्धतीपेक्षा ३०% रोपे जास्त लागतात आणि मध्यम, एकसारख्या आकाराचे कांदे मिळू शकतात. वाफ्याची लांबी-रुंदी जमिनीच्या उतारावर अवलंबून असते. १.५-२ मीटर रुंद आणि ४-६ मीटर लांबीचे सपाट वाफे तयार करावेत. वाफ्याची लांबी जमिनीच्या उताराच्या आडव्या दिशेने असावी. जमीन जास्त चढ-उताराची असल्यास १.५x३ मीटर आकाराचे लहान वाफे तयार करावेत. ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीने पाणी देण्यासाठी रानबांधणी वेगळ्या प्रकारे करावी लागते. १२० सें.मी. रुंद, ४०-६० मीटर लांब आणि १५ सें.मी. उंचीचे गादीवाफे ट्रॅक्टरला जोडता येणाऱ्या सरीयंत्राने तयार करावेत. ट्रॅक्टरच्या सहाय्याने सरीयंत्राच्या फाळाची दोन टोके १६५ सें.मी. अंतरावर ठेवल्यास १२० सें.मी. रुंदीचा गादीवाफा तयार होतो. वाफ्याच्या दोन्हीबाजूस ४५ सें.मी. रुंदीच्या दोन सऱ्या तयार होतात. या जागेचा उपयोग अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी तसेच फवारणी करणे, गवत काढणे, पिकाचे निरीक्षण करण्यासाठी होतो. ठिबक सिंचनासाठी प्रत्येक वाफ्यावर १६ मि.मी. व्यासाच्या दोन इनलाईन लॅटरल (उत्सर्ग ४ लिटर/तास) वापराव्यात. तुषार सिंचनासाठी २० मि.मी. व्यासाच्या लॅटरलवर ताशी १३५ लिटर पाणी ६ मीटर अंतरापर्यंत फेकणारे नोझल वापरावेत.
➖➖➖
राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती. कांदा पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) बटन वरुन डाउनलोड करा. 📱📱📱