🍉कलिंगड लागवड
मध्यम काळी, पाण्याचा निचरा होणारी, उदासीन सामूची जमीन निवडावी. क्षारयुक्त, चोपण, चुनखडीयुक्त जमीन कलिंगड लागवडीस अयोग्य असते. साधारणपणे नदीकाठची पोयटा रेतीमिश्रित जमीन या पिकास योग्य ठरते. उन्हाळ्यात कलिंगडास चांगली मागणी असते. त्यामुळे साधारणतः थंडी कमी झाल्यावर लागवड योग्य ठरते. कलिंगड पिकास उष्ण व कोरडे हवामान मानवते. फळांची वाढ आणि विकासाच्या कालावधीत गराची गोडी वाढण्यासाठी उष्ण दिवस व थंड रात्र योग्य ठरते.
लागवडीसाठी अर्का ज्योती, अर्का माणिक, अर्का श्यामा, शुगर बेबी, दुर्गापूर मीठा, पुसा बेदाणा या सुधारित जाती निवडाव्यात. तर खाजगी कंपनीच्या सिंबा, सुपर क्वीन, मॅक्स, मेलडी, बाहुबली, विराट, टायगर इत्यादी जाती प्रचलित आहेत. पूर्वी कलिंगड लागवड थेट बी टोकून केली जात असे. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाप्रमाणे प्लास्टिक ट्रेमध्ये रोपे तयार करून पुनर्लागवड केल्यास वेलीचे योग्य पोषण, मजूर, पाणी, इतर निविष्ठांवर होणारा खर्च आणि वेळ वाचण्यास मदत होते. यासाठी ९८ कप्पे असलेला प्रो-ट्रे वापरावा. एक ट्रे भरण्यासाठी किमान १.२५ किलो कोकोपीट लागते. एकरी ३५०-४०० ग्रॅम बियाणे आवश्यक आहे. पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. कोकोपीटने भरलेल्या ट्रेमध्ये बोटांनी छोटा खड्डा करून एका कप्प्यात एक बी पेरून कोकोपीटने झाकावे व पाणी द्यावे. सुमारे ८-१० ट्रे एकावर एक ठेऊन काळ्या पॉलीथीन पेपरने झाकावेत. रोपे उगवून आल्यावर ३-४ दिवसांत पेपर काढावा, ट्रे खाली उतरून ठेवावेत. सुमारे १६-२४ दिवसांत रोपांची पुनर्लागवड करावी.
➖➖➖
राज्यातील प्रमुख बाजारपेठेतील पिकांचे बाजारभाव व मोफत गावनिहाय हवामान अंदाज माहिती. कलिंगड पिक सल्ला आणि समस्या,कृषी योजना माहिती कृषी बातम्या,खतसाठा ,माहितीसाठी कृषिक अॅप नक्की खालील (प्ले स्टोअरच्या) बटन वरुन डाउनलोड करा. 📱📱📱