केळी
घडावर फण्यांची योग्य संख्या राखावी. खालील बाजूच्या फण्याची विरळणी करावी. प्रत्येक फणीवरील केळपत्री अलगद काढावी. घडाच्या संपर्कात येणारी किंवा घडातील केळीस घासणारी पाने किंवा पानांचा भाग कापावा. घडातील जळका चिरूटग्रस्त (फिंगर एन्ड रॉट) किंवा सिगाटोकाचा प्रादुर्भाव झालेली केळी काढून बागेबाहेर नेऊन नष्ट करावीत. घड निसवण्यापूर्वी घडावर व्हर्टीसिलीअम लेकॅनी ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. १५ दिवसांनी पुन्हा दुसरी फवारणी करावी. फळांची चांगली वाढ व गुणवत्ता सुधारण्यासाठी घडावर पोटॅशिअम डायहायड्रोजन फॉस्फेट (०.५ टक्के) ५ ग्रॅम अधिक युरिया (१ टक्के) १० ग्रॅम अधिक स्टिकर ५ मि.लि. याप्रमाणे प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी. जळका चिरूट किंवा सिगाटोका रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या घडावर, मॅंकोझेब २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. या फवारण्यानंतर ६ टक्के सच्छिद्रतेच्या पांढऱ्या किंवा निळ्या प्लॅस्टिक पिशवीने घड दांड्यासहीत झाकावेत. घडाच्या दांड्यावर सुतळीने पिशवी बांधावी. पिशवीचे खालचे तोंड मोकळे ठेवावे किंवा केळीच्या रोगमुक्त कोरड्या पानांचा वापर करूनदेखील घड झाकता येतो. पिशवीने घड झाकण्यामुळे घडाभोवती फायदेशीर सूक्ष्म वातावरण निर्मिती होऊन घडाचे तीव्र सूर्यप्रकाश आणि किडीपासून संरक्षण होते. तसेच घडाची पक्वता लवकर होऊन फळांची गुणवत्ता वाढते.
---------------------------------------------------------------------------------------------------------------अधिक माहितीसाठी आठवडी पिक सल्ला,कृषी वार्ता साठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.