शेळी पालन :-
हिवाळ्यात लहान करडांच्या मरतुकीचे प्रमाण सर्वात जास्त असते. आपण त्यांची व्यवस्थित काळजी न घेतल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते. म्हणून हिवाळ्यात करडांचा निवारा उबदार असावा. करडांचा निवारा हा नेहमी कोरडा, स्वछ आणि अमोनियामुक्त असावा; कारण हा वायू करडांच्या फुफ्फुसदाह निर्माण करून खोकला, श्वसनसंस्थेचे विकार व यातूनच जीवघेणा न्यूमोनियाचा आजार होऊ शकतो. करडांचा बिछाना कोरडा, मऊ, उबदार असावा. करडांचा बिछाना साधारणपणे २-३ दिवसांनी बदलावा. थंडी जास्त असेल त्यावेळी छोटी शेकोटी, विजेचा दिवा किंवा विजेची शेगडी वापरून गोठ्यातील हवा उबदार ठेवावी. यामुळे करडांचे सर्दी, हगवण आणि न्यूमोनिया यांपासून संरक्षण होईल. शेकोटी करताना जास्त धूर होणार नाही, याची काळजी घ्यावी. साधारणपणे गोठा एकदा उबदार झाल्यानंतर शेकोटी विझवावी. विजेचा दिवा साधारणपणे करंडापासून २० इंचांपेक्षा अधिक उंचीवर छताला टांगावा. विजेच्या दिव्याला संरक्षक पिंजरा असावा. करडांना हिवाळ्यात स्वछ आणि कोमट पाणी पिण्यासाठी द्यावे. एखाद्या करडाला खूप थंडी लागली असेल, तर त्याचे शरीर कोमट पाण्यात (४०-४५ अंश सेल्सिअस तापमान) ४-५ मिनिटे बुडवून ठेवावे, पण डोके पाण्याच्या वर ठेवावे. नंतर त्याचे शरीर व्यवस्थित चोळून त्याला स्वच्छ, कोरड्या कपड्यात किंवा गोणपाटात लपेटावे. कोरड्या जागी ठेवावे आणि जमल्यास कोमट दूध पाजावे. नवजात करडाला त्याच्या वजनाच्या १/१० इतका चिक पाजावा, त्यामुळे करडात नैसर्गिक रोगप्रतिकारकशक्ती येते. पोट साफ होण्यास मदत होते. चीक पाजल्यामुळे मरतुकीचे प्रमाण २-३ टक्के कमी करता येते.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.