वेल वर्गीय पिके
🍉🍈 कलिंगड, खरबूज लागवडीसाठी चांगले कुजलेले शेणखत व रासायनिक खतांचा बेसल डोस जमिनीमध्ये मिसळून ५ ते ७ फूट अंतरावर रुंद सरी वरंबे (गादी वाफे) तयार करावेत. ठिबक सिंचनासाठी १६ ते २० मि.मी. व्यासाच्या ४०-६० सें.मी. अंतरावर ४ लिटर प्रति तास विसर्ग असणाऱ्या इनलाईन लॅटरल गादीवाफ्यावर मधोमध अंथराव्यात. गादी वाफ्यावर ठिबक अंथरल्यावर रोपांच्या पुनर्लागवडीपूर्वी १.२ मीटर रुंद आणि ४०० मीटर लांब प्रति रोल सिल्व्हर मल्चिंग पेपर (३० मायक्रॉन जाडीचा) अंथरावा. यामुळे जमिनीचे तापमान, आर्द्रता अनुकूल राहून पांढऱ्या मुळ्यांची वाढ उत्तम होते. पाण्याची बचत, तण नियंत्रण, खताची बचत, तसेच काही प्रमाणात रसशोषक किडींचेही नियंत्रण होते. एकरी मल्चिंग पेपरचे ४ ते ५ रोल लागतात. रोपांची पुनर्लागवड करण्यासाठी ठिबक सिंचन लॅटरल आणि मल्चिंग पेपर अंथरल्यानंतर दोन इंच पाईपच्या तुकड्याच्या सहाय्याने ड्रिपरच्या दोन्ही बाजूंना १० सें.मी. अंतरावर छिद्रे पाडावीत. इनलाइन लॅटरलच्या एकाच बाजूच्या दोन छिद्रामधील अंतर १.२५ ते १.५ फूट ठेवावे. छिद्रे पाडून झाल्यावर गादी वाफे ओलावून वाफसा आल्यानंतर रोपांची पुनर्लागवड करावी. रोप लावताना रोप व्यवस्थित दाबून पेपरला चिकटणार नाही, याची दक्षता घ्यावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.